Breaking News अमरावती ई-पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ विदर्भ २४ तास रिपोर्टर

अडत्याला खरेदीदार होता येणार नाही !

अडत्याला खरेदीदार होता येणार नाही !

रिपोर्टर:- रुपेश वाळके

अमरावती:- पणन सुधारणांमध्ये आडत्याला आता विक्रेत्याबरोबर खरेदीदार म्हणून काम करता येणार नसल्याची स्पष्टता आणल्याने नफेखोरीला लगाम लागण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये अनेक आडतेच खरेदीदार असल्याने शेतमाल विक्री व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यामुळे आडत्यांचे खरेदीदारांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचेही पणन सूत्रांनी सांगितले. आता आडत्यांना केवळ खरेदी – विक्री व्यवहारात समन्वयक म्हणूनच काम पाहावे लागणार आहे.

दरम्यान, विधानपरिषदेत नुकतेच पणन सुधारणा विधेयक मागे घेतल्यानंतर, व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये होणाऱ्या अधिवेशनात पुन्हा हे विधेयक मांडले जाणार आहे. पणन सुधारणांबाबत बाजार समित्या, उपनिबंधक आणि आडत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत अधिक स्पष्टता आणण्यासाठी पणन संचालनालयाद्वारे सूचना देण्यात यावी. तसेच, कायद्यातील बदलांबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे अशी मागणी जिल्हा उपनिबंकांबरोबर आडत्यांनी केली आहे.

पणन सुधारणांमध्ये आडत्यांनी व्यापाऱ्याच्या भूमिकेतून काम करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये आडत्या हाच खरेदीदार असल्याने शेतकरी हिताला बाधा पोचत असल्याचे समोर आले आहे. आडत्याच शेतमाल खरेदी करून पुढे व्यापाऱ्यांची भूमिका बजावत असल्याने शेतमाल खरेदीमध्ये गैरव्यवहार होऊन शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. तर या व्यवहारामध्ये आडत्याच खरेदीदार असल्याने आडत ही छुप्या पद्धतीने शेतकऱ्यांकडूनच घेत फसवणूक होत असल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आडत्यांनी खरेदीदार आणि विक्रेत्याचे काम करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या सुधारणांमुळे आडत्याला केवळ खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील समन्वयकाचे काम करावे लागणार आहे. या व्यवहारामध्ये आडत्याला केवळ झालेल्या व्यवहारावर नाशवंत शेतमालाला ६ टक्के व बिगरनाशवंत शेतमालावर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आडत वसूल करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

असा आहे कायदा

आडत्या हा विक्रेत्याच्या वतीने रोख रक्कम स्वीकारणार नाही किंवा आपल्या स्वतःच्या खात्यातून कृषी उत्पन्नाची किंमत खरेदीदाराच्या वतीने विक्रेत्याला प्रदान करणार नाही.

कांदा, बटाटा, धान्याच्या अडत्यांना बसणार लगाम

अनेक कांदा, बटाटा आणि धान्याचे आडते स्वतः शेतमाल खरेदी आणि साठवणुकीतून नफेखोरी करत असल्याचे समोर आले आहे. या व्यवहारामध्ये शेतकरी हिताला बाधा पोचत असल्याने आडत्यांना आता शेतमालाची खरेदी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिक स्पष्टता नसल्याने पणन अधिकारी आणि आडते संभ्रमावस्थेत आहेत.