मनोरंजन

(युवा कवी) पवन नालट

पवन नालट.
मातीवर पडलेल्या भेगा जगण्यासाठी भांडण आहे
सुखदुःखाच्या उंबरठ्यावर शेतक-याचे रांधण आहे.
.
शासन म्हणजे फक्त गिलावा गेरूमधला वरवर दिसतो
शेतक-याचे जीवन म्हणजे आत झिरपता रांजण आहे.
.
तळहातावर मेंदी आहे पोरीच्या अन् मांडव दारी
एका हाती फास जीवाचा एका हाती आंदण आहे.
.
आम्ही जपला प्रेम जिव्हाळा एकोप्याचे गाव वसवले
नाहीतर मग, शुष्क घरांची नावेसुद्धा ‘बांधण’ आहे.
.
ज्या झाडावर फास लटकला त्या झाडाचा मोहर गेला
कौले फुटलेल्या स्वप्नांवर उपहासाचे चांदण आहे.
.
ज्या घरट्यांचे घरपण गेले प्रश्न कितीदा पडतो त्यांना
कोण घराच्या खिडक्या दारे कोण घराचे आंगण आहे.
.
कमळ फुलो की पंजा येवो पक्ष कुणीही येवो येथे
शेतक-याच्या आयुष्याचे जागोजागी कांडण आहे…..पवन नालट
*

Leave a Reply

Your email address will not be published.

seven − one =